Saturday, February 7, 2026
police dakshta logo
Homeक्राईमरावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी : सराईत मोटारसायकल चोर टोळी गजाआड...

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी : सराईत मोटारसायकल चोर टोळी गजाआड ; १३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रावेर गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १३ लाख १० हजार रुपये किमतीच्या ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.रावेर पोलिस स्टेशन येथे दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी रॉयल एनफिल्ड बुलेट चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात फिर्यादी हे जळगाव येथून रावेर येथील चौराहा परिसरात नातेवाईकांकडे आले असता त्यांनी त्यांची नविन पांढऱ्या रंगाची बुलेट घराखाली लावली होती. मात्र काही वेळाने अज्ञात चोरट्यांनी सदर मोटारसायकल चोरी केल्याचे निदर्शनास आले.या गुन्ह्याच्या तपासात रावेर शहरातील सुमारे ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. मात्र आरोपी डोक्यावर टोपी व चेहरा झाकून असल्याने ओळख पटविणे कठीण झाले. आरोपींची कार्यपद्धत ही आधी मोटारसायकल लोटत नेऊन पुढे जाऊन लॉक तोडून ती सुरू करण्याची असल्याचे निष्पन्न झाले. याच पद्धतीने भुसावळ येथेही चोरी झाल्याची माहिती मिळाल्याने तपास अधिक गतिमान करण्यात आला.

तपासादरम्यान चोरीस गेलेली बुलेट शिरपूर येथे विक्री करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तपासाचे चक्रे फिरवत चोपडा येथे धडक दिली. मात्र आरोपींना पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत कोरपावली (ता. यावल) येथे तीन आरोपींना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये१) गौरव दत्तात्रय तायडे (वय २०), २) तौसिफ तय्यब कुलकर्णी, ३) अब्दुल रहेमान तैय्यब पटेल (वय २०) सर्व रा. कोरपावली, ता. यावल, जि. जळगाव अशी आहेत.पोलिसी चौकशीत आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या कसोशीच्या तपास कौशल्यामुळे अखेर त्यांनी आतापर्यंत ९ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. तपासात त्यांनी केवळ महागड्या व नव्याने लॉन्च झालेल्या मोटारसायकली — रॉयल एनफिल्ड बुलेट, आर-वन, वर्गमन इत्यादींचीच चोरी केल्याचे उघड झाले.


चोरीतील काही मोटारसायकली कोरपावली गावातून तर काही एकांत स्थळी लपवून ठेवलेल्या अवस्थेत हस्तगत करण्यात आल्या. आरोपी केटरिंगच्या कामानिमित्त गुजरातमधील वडोदरा व इतर शहरांमध्ये रेकी करून आवडलेल्या मोटारसायकली चोरून त्या महाराष्ट्रात विकत असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच विक्रीसाठी डुप्लिकेट आरसी बुक तयार केल्याचा संशय असून त्याबाबत सखोल तपास सुरू आहे.सदर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, गुन्ह्यात आणखी साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पो. उपनि. सुनील मोरे, गुन्हे शोध पथकातील ईश्वर चव्हाण, कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, श्रीकांत वच्हाण, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकार शेख, तथागत सपकाळे, जानत बोने यांनी सहभाग घेतला असून पुढील तपास पो.ना. कल्पेश आमोदकर करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या