एरंडोल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- एरंडोल तालुक्यातील पद्मालय वनपरिक्षेत्रात आढळलेल्या अज्ञात महिलेच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या खळबळजनक खुनाचा जळगाव पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पद्मालय ते नागदुली रस्त्यालगतच्या जंगल परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा व छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.घनदाट जंगल, निर्जन परिसर व मानवी वर्दळ नसल्याने मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या (मॅगॉट्स) वाढीवरून मृत्यूचा काळ ३० किंवा ३१ जानेवारी २०२६ (शुक्रवार-शनिवार) दरम्यानचा असल्याचे निश्चित केले.मृत महिलेच्या पायाच्या नखांवरील मॅजंटा रंगाचे नेलपॉलिश तसेच डाव्या नाकपुडीतील सोन्याची ‘मुनी’ हे ओळखीचे महत्त्वाचे धागे ठरले. घटनास्थळावरील भौतिक व वस्तुजन्य पुरावे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.
गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) यास ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत महिला ही आकांक्षा उर्फ अजय हेमराज गे (रा. सोनसरार, खैरागड, जि. राजनांदगाव, राज्य छत्तीसगड) असल्याचे निष्पन्न झाले.प्राथमिक माहितीनुसार प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वैयक्तिक वादातून व रागाच्या भरात आरोपीने मृत महिलेच्या डोक्यात प्रहार केला तसेच ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहावरील कपडे काढून मोटारसायकलमधील पेट्रोल काढून मृतदेहावर ओतून जागीच जाळण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे.
या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके तयार करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे तसेच पोलीस अंमलदार ईश्वर पाटील, विनोद सुभाष पाटील व अन्य अधिकारी-अंमलदारांनी अथक परिश्रम घेत गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला

