Sunday, February 15, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणजळगाव खुर्द येथे ३ कोटींच्या वीज उपकेंद्राचे भूमीपूजन : शेतकरी व ग्रामस्थांसाठी...

जळगाव खुर्द येथे ३ कोटींच्या वीज उपकेंद्राचे भूमीपूजन : शेतकरी व ग्रामस्थांसाठी ठरणार मोठा दिलासा ; विकासकामांना गती..

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथे 33/11 केव्ही क्षमतेच्या नवीन वीज उपकेंद्राचे भूमीपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या.AIIB योजनेअंतर्गत सुमारे ३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांना दिवसा सलग ८ तास वीजपुरवठा मिळणार असून ग्रामस्थांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे उपकेंद्र स्थानिक शेती आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागात अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच कंत्राटदारांनी काम निश्चित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अन्यथा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तर खासदार स्मिताताई वाघ यांनी आपल्या भाषणात पालकमंत्र्यांच्या विकासकामांचे कौतुक करताना, दिलेला शब्द पाळण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारणीला गती मिळाल्याचे नमूद केले.
AIIB योजनेतून जळगाव जिल्ह्यासाठी ३५ नवीन वीज उपकेंद्रे, १२२६ ट्रान्सफॉर्मर, ३० केव्ही व ११ केव्ही बंद केबल लाईन तसेच सिव्हिल कामांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच जळगाव खुर्द येथे भिल्ल समाजासाठी १५ लाख रुपयांचे समाजमंदिर, तर खिरडी येथे हनुमान मंदिर परिसर विकास कामांना देखील मंजुरी देण्यात येणार आहे.

AIIB योजनेअंतर्गत मंजूर कामे.
शिरसोली व जळगाव खुर्द येथे २ नवीन उपकेंद्रे – रु. ५ कोटी.
भादली बु. येथे अतिरिक्त रोहीत्र – रु. २ कोटी.
५५ गावांत नवीन १००/२०० केव्हीए रोहीत्र – रु. २.५० कोटी.
२४ ठिकाणी रोहीत्र क्षमतावाढ – रु. १ कोटी.
१० ठिकाणी शेतीपंप व गावठाण वीज वाहिनी विलगीकरण – रु. १३.५६ कोटी.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक अभियंता पवन वाघुळदे यांनी केले, तर आभार कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांनी मानले.

प्रमुख उपस्थिती
यावेळी इन्फ्राचे अधीक्षक अभियंता मनोज विश्वासे, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, नशिराबाद नगराध्यक्ष पिंटू शेठ पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, नगरसेवक लालचंद पाटील, उपसरपंच दिनेश पाटील, कुंदन पाटील, भारतीय जनता पक्ष चे मिलिंद चौधरी, ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी भारंबे, वैशाली पाटील, माजी सरपंच भगवान महाजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील, सहायक अभियंता पवन सोनवणे, नगरसेवक कुंदन काळे, गणेश सोनवणे, कैलास व्यवहारे, तुषार महाजन, डॉ. कमलाकर पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या उपकेंद्रामुळे नशिराबाद व परिसरातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या