Sunday, February 15, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचिनावलमध्ये स्मृतिदानातून डिजिटल शिक्षणाला चालना ; विद्यार्थ्यांसाठी एलईडी टीव्ही व कायम ठेव...

चिनावलमध्ये स्मृतिदानातून डिजिटल शिक्षणाला चालना ; विद्यार्थ्यांसाठी एलईडी टीव्ही व कायम ठेव देणगी

रावेर-चिनावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील चिनावल (ता. रावेर, जि. जळगाव) येथील शिक्षण प्रसारक मंडळ, चिनावल संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल या शाळेस सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक दगडू साळुंके यांनी त्यांच्या पत्नी स्वर्गीय शालिनी अशोक साळुंके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५५ इंच एलईडी टीव्ही तसेच १ लाख रुपयांची कायम ठेव देणगी प्रदान केली.अशोक साळुंके यांनी जिल्हा परिषद ठाणे येथे तब्बल ३४ वर्षे ६ महिने शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून प्रामाणिक सेवा बजावली. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेल्या साळुंके यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य उत्कृष्ट व दूरदृष्टीपूर्ण मानले जाते. त्यांनी मुख्याध्यापक पदावर कार्यरत असताना शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले.

स्वर्गीय शालिनी साळुंके या भिवंडी, जि. ठाणे येथे उपशिक्षिका म्हणून ३५ वर्षे कार्यरत होत्या. २ जुलै २०२५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवलेल्या १ लाख रुपयांच्या निधीवरील व्याजातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी मदत करण्यात येणार आहे.या उदात्त कार्याबद्दल संस्थेच्या वतीने देणगीदारांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सुनील भास्कर महाजन यांनी डिजिटल युगात एलईडी टीव्हीचे शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डिजिटल शिक्षणाचे महत्त्व कविता नेमाडे यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांच्या हस्ते शाळेत डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले. डिजिटल अध्यापनाचे प्रात्यक्षिक उपशिक्षक संतोष काळे यांनी सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश बाविस्कर यांनी केले, तर सूत्रसंचालन हर्षाली कोल्हे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या वतीने स्वागतगीत भावना नेमाडे यांनी सादर केले. शेवटी आभार प्रदर्शन सपना ढाके यांनी केले.कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन खेमचंद्र गोवर्धन पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र वामन फालक, सचिव गोपाळ देवचंद पाटील, समिती सदस्य निळकंठ भोजराज चौधरी तसेच संचालक दामोदर यादव महाजन, अनिल सुधाकर किरंगे, विनायक कमलाकर महाजन, मनोहर विठ्ठल पाटील उपस्थित होते.तसेच नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एच. आर. ठाकरे, उपमुख्याध्यापिका मीनल नेमाडे व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) चे वाहक हर्षल साळुंके उपस्थित होते.

कार्यक्रमाची सजावट व व्यवस्था शिक्षक विनिता नारखेडे, मिलिंद गारसे, कविता पाटील, एन. एन. महाजन तसेच शिक्षकेतर कर्मचारी सिंचन नेहते व चंद्रकांत कुरकुरे यांनी केली.स्वर्गीय शालिनी साळुंके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेली ही देणगी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण मानले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या