कुटुंबीयांनाही धमक्या ; पाच आरोपी अटकेत, इतर संशयित आरोपींचा शोध सुरू..
भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- प्रेमविवाहाच्या वादातून संतप्त नातेवाईकांनी एका तरुणावर अत्यंत अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरासह खडका परिसरात उघडकीस आली आहे. संबंधित तरुणाला बेदम मारहाण करून विवस्त्र अवस्थेत फिरविण्यात आले, तसेच त्याचा गळा आवळून जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

माहितीनुसार, खडका येथील २५ वर्षीय तरुणाने काही दिवसांपूर्वी एका १८ वर्षीय युवतीसोबत प्रेमविवाह केला होता. या विवाहामुळे मुलीच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड नाराजी होती. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा तरुण आपल्या पत्नीसह शहरातील सुहास हॉटेल परिसरात नातेवाईकांकडे गेला असता, मुलीच्या नातेवाईकांनी तेथे धाड टाकली.

सुरुवातीला संबंधितांच्या कुटुंबीयांना धमकावत बाजूला करण्यात आले. त्यानंतर तरुण व त्याच्या पत्नीस मारहाण करण्यात आली. परिस्थिती अधिकच गंभीर होत गेली आणि संतप्त जमावाने तरुणाला पकडून त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी तो पळू लागला असता त्याला पुन्हा पकडण्यात आले.

यानंतर आरोपींनी त्याला जवळील डेअरी परिसरात नेऊन कपडे फाडून विवस्त्र केले. भररस्त्यात त्याला फिरवत अपमानास्पद वर्तन करण्यात आले. तसेच त्याच्याकडून जबरदस्तीने पत्नीपासून दूर राहण्याचे वक्तव्य करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुढे त्याला रिक्षाद्वारे खडका येथे नेण्यात आले.

गावात पोहोचल्यानंतरही आरोपींचा संताप शमला नाही. तरुणाच्या घराजवळ त्याला पुन्हा विवस्त्र अवस्थेत नेण्यात आले आणि त्याच्या कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आली. घर जाळण्याची धमकी देत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. अखेरीस स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून तरुणाची सुटका केली.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा हात मोडला असून त्याच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच संशयितांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, अशा प्रकारच्या अमानुष कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

