भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील फातेमा कॉलनी परिसरात घडलेल्या ५ लाख ७० हजार रुपयांच्या घरफोडी प्रकरणाचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत छडा लावून मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ४ लाख ९९ हजार १०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी वसीम अहमद अब्दुल बासित शेख (रा. फातेमा कॉलनी, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते दिनांक २८ मार्च ते ३० मार्च २०२६ दरम्यान घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले तसेच पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने अमीर खान हबीब खान (वय ३५, रा. न्यू दर्गा जवळ, भुसावळ) यास ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान आरोपीने एका विधीसंघर्ष बालकाच्या साथीने घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी ४ लाख ९९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, अटक आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.

