नगराध्यक्षांनी घेतली धाव; पाईपलाईन दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा लवकरच सुरू!
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहराला पाणीपुरवठा करणारी पेठ भागातील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या घटनेमुळे नियोजित पाणीपुरवठा एक दिवस उशिराने होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.मात्र, पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कामाची पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाकडून तत्परतेने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
सदर पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून लवकरच शहरातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे.दरम्यान, नागरिकांनी तोपर्यंत पाण्याचा काटकसरीने व योग्य वापर करावा, तसेच नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष योगेश पाटील व उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी केले आहे.


