Thursday, April 9, 2026
police dakshta logo
Homeक्राईम२४ तासांत घरफोडीचा पर्दाफाश; अट्टल चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

२४ तासांत घरफोडीचा पर्दाफाश; अट्टल चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील गणेशवाडी परिसरातील मंजुषा हाउसिंग सोसायटी येथे घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत अट्टल चोरट्याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०६.०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मंजुषा हाउसिंग सोसायटी, गणेशवाडी येथील वंदना मोहन आटाळे यांच्या घराचे कडी-कोंडा तोडून घरफोडी केली होती. यात चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी प्रमोद नामदेव आटाळे (वय ५४, रा. नंदनवन कॉलनी, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी शाकिब शेख ताजोद्दीन शेख (वय २३, रा. कासमवाडी, रचना कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिली.आरोपीकडून अर्धा ग्रॅम सोन्याची नथ, चांदीची देवाऱ्यातील विट, अन्नपूर्णा देवीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, चंद्रकोर, चांदीचा हत्ती तसेच तांब्याची भांडी असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका रामकृष्ण पाटील व पोना मोतीलाल बोरसे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या