बनावट कागदपत्रांवर ६०० हून अधिक शिक्षकांची नोंद; कोट्यवधींचा पगार अपहाराचा संशय; आजी माजी शिक्षण अधिकाऱ्यांची होणार चौकशी!
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नाशिक विभागासह जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारा शालार्थ आयडी घोटाळा समोर आला असून, या प्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई सुरू केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागातील आजी-माजी अधिकाऱ्यांसह एकूण ४८ जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.
२०१३ ते २०२६ या कालावधीत खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तपासादरम्यान अनेक शाळांनी आवश्यक पडताळणी न करता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे स्पष्ट झाले. एकूण ८९२ आयडींची तपासणी करण्यात आली असता, त्यापैकी ६०० हून अधिक आयडी पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले आहे.यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने जळगावमधील काही शाळांवर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतरच्या तपासातून संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. एसआयटीने नोटीस बजावलेल्या यादीत ११ माजी शिक्षणाधिकारी, ११ उपशिक्षणाधिकारी, ३ कक्षाधिकारी तसेच २३ कर्मचारी यांचा समावेश आहे.
सर्व संबंधितांना १५ ते १८ एप्रिलदरम्यान नाशिक येथे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सलग चार दिवस चालणाऱ्या या प्रक्रियेत बनावट आयडी मंजुरीमागील सूत्रधार कोण, तसेच प्रशासकीय पातळीवर कोणत्या त्रुटी राहिल्या याचा सखोल तपास होणार आहे. या प्रकरणामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून, पुढील कारवाईत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

