जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगळवार (दि. १४ एप्रिल) रोजी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत भैय्यासाहेब गंधे सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक व व्याख्याते सुरेश कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सचिन देशपांडे होते. यावेळी उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतून डॉ.आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर प्रभावी भाषणे सादर केली.कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षिका पद्मजा जोशी यांनी भावपूर्ण गीत सादर केले, तर संपदा तुंबडे यांनी स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. शिक्षक मनिषा वानखेडे व श्रीकांत घुगे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा मांडला.
प्रमुख वक्ते सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा सखोल आढावा घेत, शोषित, वंचित, कामगार व महिलांसाठी त्यांनी केलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. तसेच बौद्ध धर्म स्वीकारामागील त्यांच्या भूमिकेचेही विवेचन केले.अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने डॉ.आंबेडकर यांच्या पुस्तकांचे शालेय ग्रंथालयाला भेट देण्यात आल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी शील, प्रज्ञा व करुणा या गुणांचा अंगीकार करून ज्ञानसंपन्न बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता रोटे यांनी केले, तर आभारप्रदर्शन संगीता कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

