जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सतर्क असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रे बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपींकडून दुचाकीसह सुमारे ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासमवाडी परिसरात दोन संशयित युवक शस्त्रांसह फिरत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना १४ एप्रिल रोजी प्राप्त झाली होती. माहितीची तात्काळ दखल घेत गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले.
यानुसार, पोलिसांनी कासमवाडी ते नेरी नाका मार्गावरील एकता चौक परिसरात सापळा रचला. दरम्यान, पल्सर दुचाकीवरून येणाऱ्या दोन तरुणांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.झडतीदरम्यान आरोपींकडून गावठी बनावटीचा कट्टा, लोखंडी कोयता व कट्ट्याचे मॅगझिन आढळून आले.पोलिसांनी रोहित गोपाळ कुंवर (वय २२, रा. कासमवाडी) आणि सागर रामा सोनवणे (वय २१, रा. मेहरूण) यांना अटक केली असून, त्यांच्याकडून कट्टा, दुचाकी व इतर साहित्य असा एकूण ७०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

