जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मेहरूण तलावाजवळील कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर सुरू असलेल्या जळगाव क्रिकेट लिग-२०२६ (JCL T-20) स्पर्धेत रोमांचक सामने रंगत असून प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आणि अलरीक इलेक्ट्रीकल्सच्या सहप्रायोजकत्वाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात जळगाव कोगटा किंग संघाने अमळनेर सुहांस जायंटसवर ३१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून अमळनेर संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. नाणेफेकप्रसंगी बीसीसीआयचे पंच विनित कुलकर्णी व जैन इरिगेशनचे पंकज बऱ्हाटे उपस्थित होते.
प्रथम फलंदाजी करताना जळगाव कोगटा किंगने दमदार सुरुवात केली. ओम भोसले आणि जितेंद्र नाईक यांनी पहिल्या चार षटकांत ४४ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर ओम भोसलेने आक्रमक खेळ करत १० षटकार व ८ चौकारांच्या जोरावर अवघ्या ६५ चेंडूत १३० धावांची वादळी खेळी साकारली. हे त्याचे सलग दुसरे शतक ठरले. अक्षय मेघानीने २७ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. निर्धारित २० षटकांत जळगाव कोगटा किंगने ५ बाद २२० धावांचा डोंगर उभा केला.२२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमळनेर सुहांस जायंटसची सुरुवात डळमळीत झाली. कर्णधार शुभम शर्मा याने ३९ चेंडूत ६८ धावांची झुंजार खेळी केली. मानव टिभीरीवालाने १९ चेंडूत ३४ धावा, तर रणजीत निकमने १५ चेंडूत २५ धावा करत संघाला सावरले. मात्र, ठराविक अंतराने गडी बाद होत राहिल्याने अमळनेर संघ २० षटकांत ६ बाद १८९ धावांपर्यंतच मजल मारू शकला.जळगाव कोगटा किंगकडून मनिष चौहान याने ४ षटकांत ४० धावा देत ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले. कर्णधार जगदीश झोपे आणि बिपीन चांगरे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.या विजयासह जळगाव कोगटा किंगने सलग दोन सामने जिंकत ४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. सामनावीर पुरस्कार सलग दुसऱ्या वेळी ओम भोसले याला प्रदान करण्यात आला, तर ‘डॉट बॉल’ पुरस्कार राज बेलदार याला देण्यात आला.
या सामन्यावेळी प्रेम कोगटा, राजेंद्र लढ्ढा, चंदन महाजन, विराज कावडीया, अजय अग्रवाल व नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणून मंगेश नार्वेकर व संदीप गांगुर्डे यांनी, तर गुणलेखनाचे काम मोहम्मद फजल यांनी पाहिले.

