जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील सपडू महाजन यांच्या विरोधात 13 संचालकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. संबंधित पत्राद्वारे सभापतींच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले असून या प्रकरणामुळे बाजार समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, सभापती सुनील महाजन हे संचालक मंडळाशी विसंगत व बेजबाबदार पद्धतीने वागत असून त्यांचा कारभार मनमानी स्वरूपाचा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच बाजार समितीच्या कामकाजाचे योग्य आर्थिक नियोजन करण्यात अपयश आले असून निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचेही संचालकांनी स्पष्ट केले आहे.सदर पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, सभापती संचालक मंडळाचा विश्वास गमावून बसले असून त्यांच्या कार्यपद्धतीमुळे समितीचे कामकाज बाधित होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून त्यांना सभापती पदावरून पदमुक्त करण्यात यावे, अशी मागणी अर्जदार संचालकांनी केली आहे.
या अविश्वास प्रस्तावावर पल्लवी जितेंद्र देशमुख, शामकांत बळीराम सोनवणे, मनोज दयाराम चौधरी, योगराज नामदेव सपकाळे, लक्ष्मण गंगाराम पाटील, जयराज जिजाबराव चव्हाण, मिलींद दत्तात्रय चौधरी, संदिप लक्ष्मण पाटील, समाधान लहु धनगर, अरुण लक्ष्मण पाटील, लिना पंकज महाजन, हेमलता प्रकाश नारखेडे, यमुनाबाई इंद्रराज सपकाळे, अशा एकूण 13 संचालकांच्या स्वाक्षऱ्या असून, संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला असून नियमानुसार पुढील प्रक्रिया लवकरच पार पडण्याची शक्यता आहे.

