मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर शहरासह संपूर्ण तालुक्यात पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहनचालकांना इंधनासाठी एका पेट्रोल पंपावरून दुसऱ्या पेट्रोल पंपावर फिरावे लागत असून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध असल्याने तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा व मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर अनेक पेट्रोल पंपांवर “डिझेल उपलब्ध नाही” तसेच काही ठिकाणी “पेट्रोल व डिझेल उपलब्ध नाही” असे फलक लावण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
अचानक निर्माण झालेल्या या तुटवड्यामुळे शेतकरी, व्यापारी, प्रवासी तसेच दैनंदिन कामासाठी वाहनांचा वापर करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत. संबंधित प्रशासनाने व तेल वितरण विभागाने लवकरात लवकर परिस्थिती सुरळीत करून इंधन पुरवठा नियमित करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

