Sunday, May 31, 2026
police dakshta logo
Homeआरोग्यजागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त यावलमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश

जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त यावलमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश

गृह रक्षक दलाच्या जवानांनी घेतली ‘व्यसनमुक्त भारत’ची सामूहिक शपथ

यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- समाजात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे आरोग्य, कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक जीवनावर होत असलेल्या गंभीर परिणामांच्या पार्श्वभूमीवर जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त शनिवारी (दि. ३१ मे) यावल येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी यावल तालुका गृह रक्षक दलाच्या (होमगार्ड्स) जवानांनी ‘व्यसनमुक्त भारत’ घडविण्याची सामूहिक शपथ घेत व्यसनमुक्तीचा निर्धार व्यक्त केला.यावल तालुका विधी सेवा समिती आणि यावल वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. आर. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते शशिकांत वारूळकर यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, इतर व्यसनांच्या तुलनेत तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असून, भारतात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाणही यामुळे वाढत आहे. देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांचे निरोगी आणि सुदृढ असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.जवानांशी संवाद साधताना त्यांनी व्यसनांपासून दूर राहण्यासाठी महत्त्वपूर्ण उपायही सांगितले. व्यसनाची इच्छा निर्माण होण्यामागील ‘ट्रिगर पॉईंट’ ओळखणे, रिकाम्या वेळेत चांगले छंद जोपासणे, व्यसनी संगती टाळणे तसेच नियमित व्यायाम आणि मैदानी खेळांना प्राधान्य देणे यामुळे व्यसनमुक्त जीवन जगणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल तालुका गृह रक्षक दलाचे समादेशक विजय जावरे होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सेक्शन लीडर कैलास दत्तात्रय लावणे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक अजय बढे, हेमंत फेगडे तसेच गृह रक्षक दलाचे सीनियर फलटण नायक पंकज आणि ज्योती सदाशिव बारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास गृह रक्षक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या