Saturday, June 6, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव वाहतूक शाखेची विशेष मोहीम; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, दोन लाखांहून अधिक...

जळगाव वाहतूक शाखेची विशेष मोहीम; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, दोन लाखांहून अधिक दंड वसूल

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यात सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई केली. या मोहिमेत एकूण २७१ बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ₹२ लाख ३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.दिनांक ३ जून २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणे, वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणे, विनापरवाना वाहन चालविणे तसेच इतर वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. “वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हेल्मेट व सीटबेल्टचा नियमित वापर, वेगमर्यादेचे पालन आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,” असे त्यांनी सांगितले.यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असून अशा विशेष तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेतील एक अधिकारी व २३ अंमलदारांनी या मोहिमेत सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या