मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर शहरात भेसळयुक्त पेट्रोल विक्री होत असल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पेट्रोल पंपावरून खरेदी केलेले पेट्रोल बाटलीत भरल्यानंतर त्यामध्ये पाण्याचे थर स्पष्टपणे दिसून आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये अचानक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. इंजिन मिसफायर होणे, गाडी बंद पडणे, मायलेज कमी होणे आणि दुरुस्तीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्याने वाहनधारक अक्षरशः हैराण झाले आहेत.विशेष म्हणजे, पेट्रोलचे नमुने बाटलीत घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये पाण्याचे प्रमाण दिसून आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे “पेट्रोलमध्ये भेसळ होत आहे का?” असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.नागरिकांनी संबंधित विभागाकडे तात्काळ चौकशी करून पेट्रोलचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याची मागणी केली आहे. तसेच दोषी आढळल्यास कठोर कारवाई करून नागरिकांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
एका संतप्त वाहनधारकाने सांगितले की, “पेट्रोलसाठी पूर्ण पैसे मोजायचे आणि बदल्यात गाडी दुरुस्तीसाठी हजारो रुपये खर्च करायचे, हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करायचा?”दरम्यान, या प्रकरणात पुरवठा विभाग, वजन व मापे विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा तातडीने हस्तक्षेप करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांचा थेट सवाल…
“बाटलीतील पेट्रोलमध्ये पाणी आढळत असेल तर जबाबदार कोण? आणि कारवाई कधी होणार?”
मुक्ताईनगरातील वाहनधारक आता उत्तरांची वाट पाहत असून प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन सत्य बाहेर आणावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

