Wednesday, June 10, 2026
police dakshta logo
Homeअपघातडंपरच्या चाकाखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांकडून वाहनाला आग

डंपरच्या चाकाखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांकडून वाहनाला आग

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावत तीव्र संताप व्यक्त केला. सुदैवाने मृत व्यक्तीसोबत असलेली चार वर्षीय नात या दुर्घटनेतून थोडक्यात बचावली.

मिळालेल्या माहितीनुसार, तपत कठोरा येथील रहिवासी आनंदा मुकुंद पाटील (वय ५५) हे आपल्या चार वर्षीय परी या नातीसह दुचाकीने शेतातून घरी परतत होते. यावेळी पिंप्रीसेकमकडे जाणाऱ्या शिवार रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू होते. अरुंद रस्त्यामुळे एक डंपर मागे घेत असताना दुचाकी त्याच्या मागील बाजूस आल्याने भीषण अपघात घडला.डंपरची जोरदार धडक बसून दुचाकी वाहनाखाली अडकली. या दुर्घटनेत आनंदा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली लहानगी परी ही चमत्कारिकरित्या बचावली.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना बाहेर काढून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आनंदा पाटील यांना मृत घोषित केले.या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. संतप्त ग्रामस्थांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपरला आग लावली. आग लागल्यानंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले.

दरम्यान, या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या