Tuesday, June 23, 2026
police dakshta logo
Homeक्राईमविहीर अनुदानाच्या कामासाठी लाचेची मागणी; जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तंत्रज्ञ एसीबीच्या कारवाईत...

विहीर अनुदानाच्या कामासाठी लाचेची मागणी; जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तंत्रज्ञ एसीबीच्या कारवाईत अटकेत

जामनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या लाचखोरीच्या घटनांमध्ये आणखी एका प्रकरणाची भर पडली असून, विहीर अनुदान मंजुरीसाठी लाचेची मागणी करणाऱ्या जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या कारवाईमुळे पंचायत समिती प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.सागर न्हावकर असे अटकेत घेतलेल्या कंत्राटी वरिष्ठ तंत्रज्ञाचे नाव असून, संबंधित तक्रारदाराच्या विहिरीच्या अनुदान प्रकरणासाठी त्याने यापूर्वी ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी जामनेर पंचायत समिती परिसरात सापळा रचला.कारवाईदरम्यान संशय आल्याने संबंधित आरोपीने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. मात्र, चौकशीत त्याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत अटक केली.

पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे तसेच त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, या कारवाईनंतर शासकीय कार्यालयांमध्ये लाचेच्या व्यवहारांबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या