Wednesday, September 23, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबादमध्ये पत्नीचा कोयत्याने निर्घृण खून ; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

नशिराबादमध्ये पत्नीचा कोयत्याने निर्घृण खून ; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील भवानीनगर भिलाटी परिसरात राहणाऱ्या विवाहितेचा तिच्याच पतीने कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला तात्काळ ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.मंदाबाई विकास जाधव असे मृत महिलेचे नाव असून त्या मूळच्या रायपूर कंडारी येथील रहिवासी होत्या. काही काळ त्या जामनेर तालुक्यातील चिचखेडा येथे वास्तव्यास होत्या. त्यानंतर त्या पती विकास जगन्नाथ जाधव यांच्यासह नशिराबाद येथील भवानीनगर भिलाटी परिसरात राहत होत्या. मृत मंदाबाई या रामा सोमा बागले, रा. भवानीनगर, नशिराबाद यांच्या कन्या होत.

माहितीनुसार, मंदाबाई जाधव या आपल्या मुलाच्या शाळा प्रवेशासंदर्भात सुनसगाव रोडवरील जिल्हा परिषद मराठी शाळेत गेल्या होत्या. दरम्यान, दुपारी सुमारे २ ते २.२० वाजण्याच्या दरम्यान नशिराबाद येथील खंडेराव मंदिर परिसरात आरोपी पती विकास जगन्नाथ जाधव याने कोयत्याने सपासप वार करत पत्नीवर हल्ला केला. या हल्ल्यात मंदाबाई जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत ६ वर्षांचा मुलगा होता. घटना घडल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलाला तात्काळ तेथून शाळेत सुरक्षित नेले.घटनेनंतर आरोपी काही अंतरावरील ओसाड पडलेल्या अवस्थेतील घरात आढळून आला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले तसेच पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) केदार बारबोले, नशिराबाद पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी योगिता नारखेडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी संशयित आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.सदर घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे व नशिराबाद पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या