Tuesday, June 30, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांना कपडे, दप्तर व बूटांचे वाटप; जागृती विद्यालयात सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

विद्यार्थ्यांना कपडे, दप्तर व बूटांचे वाटप; जागृती विद्यालयात सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- हंबर्डी. ता .यावल येथील जागृती विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कपडे, दप्तर व बूट वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून शिक्षणासाठी त्यांना मोठा आधार मिळाला आहे.या उपक्रमाचे प्रमुख दाते व सामाजिक कार्यकर्ते राजू रोटे व त्यांच्या पत्नी सौ. जयश्री राजू रोटे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना कपडे, दप्तर व बूटांचे वाटप करण्यात आले. तसेच माजी सरपंच किशोर पाटील, गोपाल नेमाडे व कैलास तायडे यांनी आर्थिक व सामाजिक स्वरूपाचे मोलाचे सहकार्य केले.

याशिवाय गावातील दिलीप रामा पाटील, राजेंद्र सोनवणे, सुपडू नेहेते, महेन सावकारे, रमजान तडवी, सुपडू सोनवणे, संदीप पाडवी, अक्षय वाघुळदे, निखिल सोनवणे, भूषण हटकर, समीर तडवी, जावेद तडवी, अकबर तडवी व दगडू तडवी यांनीही उदारपणे सहकार्य करून उपक्रम यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये दिनेश बारेला, आरिफ तडवी व गिरा बारेला यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला यावल-रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, जागृती विद्यालय टिकून राहावे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच शाळेच्या विविध अडचणी दूर व्हाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न व सहकार्य केल्याबद्दल विद्यालयाच्या संचालक मंडळाच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.तसेच फिरोज पठाण यांनीही जागृती विद्यालय टिकून राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत, “शाळेच्या प्रत्येक लढ्यात मी पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत उभा राहीन,” असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेबद्दलही विद्यालयाच्या संचालक मंडळाने विशेष आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक लखन झाल्टे, लिपिक हुकूमचंद किरंगे तसेच पंकज टोके यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या संचालक मंडळाच्या वतीने सर्व दाते, सहकारी, पालक, ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उमेद मिळत असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्राला मोठी प्रेरणा मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या