Sunday, July 5, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव: सबगव्हाण टोलनाक्यावर भीषण अपघात ; गॅस टँकरला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

जळगाव: सबगव्हाण टोलनाक्यावर भीषण अपघात ; गॅस टँकरला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर सबगव्हाण टोलनाक्याजवळ शुक्रवारी संध्याकाळी भीषण अपघात घडला. भरधाव गॅस टँकरने समोरील ट्रकला जोरदार धडक दिल्यानंतर टँकरने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत टँकरमधील चालक व क्लिनर यांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.अपघातानंतर काही क्षणांतच टँकरला भीषण आग लागल्याने टोलनाका परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पारोळा अग्निशामक दल, पोलीस, महसूल विभाग, नगरपालिका प्रशासन तसेच रुग्णवाहिका पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने जवळपास दोन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

टँकरमध्ये ज्वलनशील वायू असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. सुदैवाने आग अधिक पसरली नाही आणि मोठी जीवितहानी टळली. मात्र, टँकरमधील अन्य व्यक्तींबाबत रात्री उशिरापर्यंत स्पष्ट माहिती मिळू शकली नव्हती.या दुर्घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जवळपास दोन ते तीन तास विस्कळीत झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक अन्य मार्गाने वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली.दरम्यान, अपघाताची संपूर्ण घटना सबगव्हाण टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या