सहकार विभागाकडून तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या कारभारासंदर्भात करण्यात आलेल्या विविध तक्रारींची सहकार विभागाने गंभीर दखल घेतली असून, बँकेतील कंत्राटी भरती प्रक्रिया तसेच कथित नियमबाह्य कारभाराच्या चौकशीसाठी विभागीय स्तरावर हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच विभागीय सहनिबंधक, नाशिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीचे आदेश दिल्याने बँकेच्या कारभाराबाबत नव्याने चर्चा रंगू लागली आहे.लोकनियुक्त सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेशआप्पा गो. पाटील (झुरखेडा, ता. धरणगाव) यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीबाबत सादर केलेल्या तक्रार अर्जाची सहकार आयुक्त कार्यालयाने दखल घेतली आहे. दि. ३० जून २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या तक्रारीत बँकेत बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२५, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना तसेच शासन आदेशांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.तक्रारीमध्ये बँकेतील कथित नियमबाह्य कारभाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व संचालक मंडळावर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर सहकार आयुक्त कार्यालयाने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांना शासन निर्णय व धोरणांच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून अर्जदारास कळविण्याचे निर्देश दिले आहेत.दरम्यान, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुरू असलेल्या कंत्राटी नोकरभरती प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. श्री. पाटील यांनी केलेल्या स्वतंत्र तक्रारीची दखल घेत विभागीय सहनिबंधक, नाशिक यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांना तातडीने चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.तक्रारीनुसार शासनाने नियमित भरतीस मान्यता दिलेली असताना पारदर्शकता व गुणवत्तेच्या निकषांनुसार भरती होणे अपेक्षित होते. मात्र, संचालक मंडळाने शासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची गंभीर दखल घेत विभागीय सहनिबंधकांनी चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत भरती प्रक्रियेबाबत कोणतीही पुढील कार्यवाही करू नये, अन्यथा भविष्यात उद्भवणाऱ्या वादासाठी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
सहकार विभागाच्या या आदेशांमुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी चौकशी अहवाल आणि त्यानंतर होणाऱ्या निर्णयाकडे सहकार क्षेत्रासह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

