Sunday, July 5, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबादच्या भवानीनगरात तीन वर्षीय चिमुकलीचा पाण्याच्या हौदात पडून दुर्दैवी मृत्यू

नशिराबादच्या भवानीनगरात तीन वर्षीय चिमुकलीचा पाण्याच्या हौदात पडून दुर्दैवी मृत्यू

वाढदिवसाच्या आठवणी ताज्या असतानाच काळाचा घाला!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील भवानीनगर परिसरात रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घराच्या आवारात खेळत असलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कुमारी आकांक्षा प्रवीण (आबा) इंगळे असे मृत बालिकेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा ही रविवारी दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराच्या अंगणात खेळत होती. त्यावेळी घरातील सदस्य जेवणासाठी बसले होते. खेळताना अचानक तिचा तोल जाऊन ती घरातील पाण्याने भरलेल्या हौदात पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही वेळानंतर आकांक्षा घरात दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. परिसरात शोध घेत असताना ती हौदामध्ये आढळून आली.घटनेनंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, आकांक्षाचा तिसरा वाढदिवस काही दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. १ जुलै रोजी कुटुंबीयांनी आनंदात वाढदिवस साजरा केला होता. त्या आनंदाच्या आठवणी ताज्या असतानाच नियतीने घात केलेल्या या घटनेने कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.घटनेची माहिती मिळताच बौद्ध पंच मंडळाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी घटनास्थळी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच आवश्यक कार्यवाहीसाठी त्यांनी सहकार्य केल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घराच्या परिसरातील पाण्याचे हौद, टाक्या, विहिरी किंवा इतर धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षाव्यवस्था ठेवण्याची गरज अधोरेखित होत आहे. विशेषतः लहान मुले खेळत असताना पालकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.या दुर्दैवी घटनेमुळे भवानीनगर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांकडून इंगळे कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या