नामांकित कलाकारांच्या स्वरसेवेत रंगणार भक्तिमय संध्या; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील कोल्हेनगर परिसरालगत असलेल्या प्रसिद्ध व जागृत श्री काशी विश्वेश्वर मंदिरात सोमवार, दिनांक ६ जुलै रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता “भक्तीनाद” भजन संध्या ग्रुपतर्फे भव्य भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणपूर्व पवित्र वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या भक्तिमय कार्यक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या भजन संध्येत जळगावातील विविध नामांकित गायक व कलाकार आपल्या स्वरसेवेद्वारे भगवान शंकरांच्या चरणी भक्तीभाव अर्पण करणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध गायक निलेश पाटील, ज्येष्ठ कलावंत व निवेदक तुषार वाघुळदे, गायिका वृंदा पालखे, राखी हेडा तसेच प्रवीण पाटील हे कलाकार सहभागी होणार असून, त्यांच्या सुरेल भक्तीगीतांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.शहरातील जुने रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या मागे, माजी महापौर ललितभाऊ कोल्हे यांच्या बंगल्याजवळ, भगवान नगर परिसरात वसलेले श्री काशी विश्वेश्वर मंदिर हे अत्यंत शांत, स्वच्छ व जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिर परिसरातील निसर्गरम्य वातावरण आणि अध्यात्मिक ऊर्जा यामुळे दररोज मोठ्या संख्येने शिवभक्त येथे दर्शनासाठी येत असतात. अशा पवित्र वातावरणात आयोजित करण्यात आलेली “भक्तीनाद” भजन संध्या भाविकांसाठी एक विशेष आध्यात्मिक पर्वणी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
भजन कार्यक्रमादरम्यान विविध पारंपरिक भक्तिगीते, अभंग, शिवस्तुती आणि भावस्पर्शी सादरीकरणांद्वारे उपस्थित भाविकांना भक्तीचा अनोखा अनुभव मिळणार आहे. विशेषतः कुटुंबासह सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी हा कार्यक्रम अध्यात्म, संस्कृती आणि संगीताचा सुंदर संगम ठरणार आहे.या भक्तीनाद भजन संध्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील आबालवृद्ध नागरिक, शिवभक्त आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन “भक्तीनाद” ग्रुपचे तुषार वाघुळदे व मंगला पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.