नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरातील विविध विकासकामांमुळे तसेच अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या खोदकामानंतर रस्त्यांची झालेली दुरवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, गणेश नगर परिसरातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.गणेश नगर, न्यू इंग्लिश स्कूलजवळील न्यू प्लॉट एरिया येथील रहिवासी देवेंद्र भंगाळे यांनी मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत परिसरातील रस्त्यांची गंभीर अवस्था निदर्शनास आणून दिली आहे.
निवेदनानुसार, नगरपरिषदेकडून अवघ्या वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेले रस्ते अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईन व इतर कामांसाठी खोदण्यात आले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने रस्ता पूर्ववत न केल्याने पावसाळ्यात संपूर्ण परिसरात चिखल व पाणी साचून नागरिकांचे हाल होत आहेत.रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना वाढल्या असून, परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले घसरून पडत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जागोजागी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढून साथीचे आजार पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.निवेदनात नागरिकांनी यापूर्वी अनेकदा नगरपरिषद कार्यालयात तक्रारी करूनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. भविष्यात या रस्त्यामुळे गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान,
नगराध्यक्ष योगेश पाटील यांचे नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशात नशिराबाद शहरात विविध ठिकाणी प्रॉपर्टी चेंबर, रस्ते व इतर विकासकामे प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले आहे. या कामांमुळे तसेच पावसाळ्यामुळे काही ठिकाणी चिखल, वाहतुकीतील अडथळे व तात्पुरत्या अडचणी निर्माण होत असल्या तरी ही परिस्थिती तात्पुरती असून सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

