भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- एसटी बसमधून प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्यांनी शेतकरी इसमाच्या चोरखिशातील दागिन्यांचे पाऊच लंपास केल्याची घटना जामनेर-कुऱ्हा पानाचे दरम्यान घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत कांतीलाल मोतीलाल चोपडा (व्यवसाय – शेती, रा. शेंगोळा, ता. जामनेर) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार, दि. ३ जुलै रोजी ते लोहारा ते भुसावळ या एसटी बसने प्रवास करीत होते. दरम्यान, जामनेर ते कुऱ्हा पानाचे गावादरम्यान सकाळी ११.२० ते ११.४५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या चोरखिशात ठेवलेले दागिन्यांचे पाऊच चोरून नेले.चोरीस गेलेल्या ऐवजात ३ तोळ्यांची सोन्याची पोत, १.५ तोळ्यांची सोन्याची चैन, २.५ तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट तसेच २ तोळ्यांच्या चार सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश असून, एकूण ९ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. या दागिन्यांची एकूण किंमत ३ लाख ६० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे पुढील तपास करीत आहेत.

