अतिक्रमणामुळे काम रखडल्याचा अधिकाऱ्यांचा दावा; नगराध्यक्षांसह लोकप्रतिनिधींकडून सहकार्याचे आश्वासन, पाणी निचऱ्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :
तरसोद बोगद्याजवळील सर्व्हिस रोडवर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या गंभीर समस्येची दखल घेत जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी रविवारी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची सविस्तर माहिती घेत नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश दिले.
पाहणी दरम्यान संबंधित वरिष्ठ अधिकारी साळुंके यांनी पाणी निचऱ्याचे काम अतिक्रमणामुळे रखडल्याचे कारण सांगितले. त्यावर खासदार स्मिता वाघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, कोणतेही कारण पुढे न करता पाच ते सहा दिवसांच्या आत पाणी निचऱ्याचे काम पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याचे स्पष्ट आदेश दिले. दरवर्षी याच समस्येमुळे वाहतूक विस्कळीत होत असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारचा विलंब खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील यांनी तरसोद बोगद्याच्या पुढे उंटबीडी रिक्षा स्टॉपजवळील अरुंद व खचलेल्या रस्त्याच्या समस्येकडेही खासदार वाघ यांचे लक्ष वेधले. संबंधित रस्ता अरुंद व खराब अवस्थेत असल्याने एसटी बस गावात येण्यास टाळाटाळ करत असून, त्याचा फटका विद्यार्थी, कामगार तसेच ग्रामस्थांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्येचीही तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, तसेच लवकरच यावर योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन खासदार स्मिता वाघ यांनी दिले.
यावेळी नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील, सभापती कीर्तिकांत चौबे, सभापती मनोज पाटील, नगरसेवक बापू बोढरे, सचिन महाजन तसेच अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पाणी निचऱ्याच्या कामात कोणत्याही प्रकारची स्थानिक अडचण अथवा अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण होऊ दिला जाणार नसून, प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही लोकप्रतिनिधींनी दिली. खासदार स्मिता वाघ यांनी संबंधित विभागाला पाणी निचऱ्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. तरसोद बोगद्याजवळील ही समस्या, महालक्ष्मी मंदिराजवळील चौफुलीवरील लाईटची समस्या तसेच उंटबीडी रिक्षा स्टॉप परिसरातील रस्त्याचा प्रश्नही लवकर निकाली निघावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.