मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
जळगाव / प्रतिनिधी / पोलीस दक्षता लाईव्ह:- शहरातील रिंगरोडवरील प्रतापनगर येथील मुख्य केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.१२ ते १८ एप्रिल २०२३ पर्यंत हा सप्ताह चालणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहादरम्यान चारशे सेवेकरी भाविकांकडून सामूहिक गुरुचरित्र पठन केले जाणार आहे. आज दि.१२ एप्रिलपासून त्याची सुरुवात झाली. केंद्रातील भव्य मंडपात गुरुचरित्र वाचणाऱ्या सेवेकऱ्यांसाठी खास बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या सप्ताहात २४ तास प्रहरे सेवा सुरू करण्यात आली आहे. दिवसा महिलांसाठी तर रात्री पुरुषांसाठी ही सेवा सुरू राहणार आहे, यासाठी अगोदरच सेवेकऱ्यांची नाव नोंदणी करण्यात आलेली आहे. प्रहरे सेवेसाठी वेळ ठरवून देण्यात आलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारासमोर स्वामींची आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे.
सप्ताह सुरू झाल्याने केंद्राची साफसफाई अगोदरच करण्यात आलेली आहे. यशस्वीतेसाठी अनेक सेवेकरी विविध जबाबदारी सांभाळत आहेत. जळगाव येथील इतर केंद्रांमध्ये देखील कार्यक्रम होत असल्याची माहिती केंद्रातर्फे देण्यात आली.