जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने एक वर्षासाठी स्थानबद्ध; येरवडा कारागृहात रवानगी
जळगाव : नशिराबाद परिसरातील सराईत गुन्हेगार शोएब शेख गुलाम नबी उर्फ ‘शोएब बिल्डर’ (वय ३५, रा. ख्वाजा नगर, नशिराबाद) याच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. कारवाईनंतर त्याची मध्यवर्ती कारागृह, येरवडा (पुणे) येथे रवानगी करण्यात आली.शोएब बिल्डर याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, चोरी, बेकायदेशीररीत्या गर्दी जमवून मारहाण करणे तसेच तडीपारी आदेशाचे उल्लंघन यांसारखे गंभीर स्वरूपाचे एकूण ७ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या कथित गुन्हेगारी कारवाया आणि परिसरातील दहशतीच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांनी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला.हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. प्रस्तावाची छाननी करून जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचा आदेश जारी केला. त्यानंतर पोलिसांनी शोएब बिल्डर याला ताब्यात घेत येरवडा मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या स.पो.नि. योगिता एम. नारखेडे, पो.उप.नि प्रिया दातीर, पो.हे.कॉ. गुणवंत देशमुख , पो.हे.कॉ. प्रशांत विरणारे, पो.कॉ. भरत बाविस्कर, पो.कॉ. पंकज सोनवणे, पो.कॉ. प्रविण लोहार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे स.फौ. सुनिल दामोदरे यांच्या पथकाचा सहभाग होता.