Saturday, September 5, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणन्यू इंग्लिश स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात; चिमुकल्यांच्या रासलीलेने रंगला गोकुळाचा सोहळा

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात; चिमुकल्यांच्या रासलीलेने रंगला गोकुळाचा सोहळा

नशिराबाद : नशिराबाद शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्रांगणाला गोकुळाचे स्वरूप प्राप्त झाले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास चौधरी होते. यावेळी मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष विनायक वाणी, संचालक जनार्दन माळी, ॲड. प्रदीप देशपांडे तसेच मुख्याध्यापक प्रवीण महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व आरतीने करण्यात आली.यानंतर विद्यार्थ्यांनी राधा-कृष्ण, वासुदेव, देवकी, यशोदा, कालिया नाग व बाळ गोपाळांच्या वेशभूषेत सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णावर आधारित नृत्य सादर केले. तसेच नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी घागरा-ओढणीच्या पारंपरिक वेशात रासलीला सादर केली. या रासलीलेत कृष्ण-सुदामा भेट व कालिया मर्दनाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी ‘गोविंदा आला रे आला’ तसेच ‘कृष्ण जन्मला गं बाई, कृष्ण जन्मला’ या गीतांवर नृत्य सादर करून वातावरण भक्तिमय केले. रासलीलेदरम्यान श्रीकृष्णाचा जयजयकार करण्यात आला. त्यानंतर कृष्ण व त्याच्या सवंगड्यांनी दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमाच्या समारोपानंतर बाळ गोपाळांनी उपस्थित मान्यवर, अतिथी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गोपाळकाल्याचा प्रसाद वाटला.बालकृष्णाच्या भूमिका नमन बोंडे, विदीप सपकाळे व स्वप्निल बाविस्कर यांनी, तर राधेच्या भूमिका फाल्गुनी कोल्हे व यशस्वी मराठे यांनी साकारल्या. देवकीची भूमिका देवांशी सपकाळे, वासुदेवाची भूमिका कृष्णा वाणी, यशोदेची भूमिका स्वरा अत्तरदे, कालिया नागाची भूमिका स्वराज भावसार तर सुदामाची भूमिका रुद्र चौधरी यांनी साकारली.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन वैशाली पाचपांडे, भावना भावसार, सुनीता शिवरामे, मनीषा घोडकर व स्वाती चौधरी यांनी केले. यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनीता शिवरामे यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या