मेहरूण | प्रतिनिधी :- किड्स झोन प्री-स्कूल, राज प्राथमिक-माध्यमिक विद्यालय आणि डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेज, मेहरूण यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. माजी महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका मा. सौ. जयश्रीताई महाजन यांच्या शुभहस्ते श्री गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या आकर्षक मिरवणुकीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. लेझीमच्या तालावर तसेच ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यावेळी शाडू मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच सण-उत्सवांच्या माध्यमातून संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजावी, या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.