कांदा लागवडीदरम्यान घडली धक्कादायक घटना; वनखाते व जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी
असोदा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शिवारातील शांताराम चिंधु महाजन यांच्या शेतात सोमवारी कांदा लागवडीचे काम सुरू असताना भरदुपारी दोन रानडुकरांनी महिला मजुरांवर अचानक हल्ला चढविल्याने एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेसह तिघी जखमी झाल्या असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील महिला मजूर कांदा लागवडीचे काम करत असताना सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दोन रानडुकरांनी अचानक शेतात प्रवेश करून महिलांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेसह पाच वर्षीय बालिकेला रानडुकराने चावा घेतला, तर आणखी एका महिलेला धक्काबुक्कीमुळे मुका मार लागला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शेतात काम करणाऱ्या सर्व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर दुपारी त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मिळाली.या घटनेतील भव्या सुनील नारखेडे (वय ५ वर्षे), तमीज अन्वर पिंजारी (वय ५५ वर्षे), माधुरी येवले (वय ३० वर्षे जखमी झाले असून या घटनेनंतर शेतकरी शांताराम चिंधु महाजन यांनी शेतांमध्ये वाढत्या रानटी जनावरांच्या वावरामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे सांगत वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही काळात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने स्थानिक पातळीवर तसेच प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेने असोदा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

