Monday, November 2, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबादमध्ये गोवंश मांस विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई..!

नशिराबादमध्ये गोवंश मांस विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई..!

इस्लामपुरा परिसरात छापा; २० किलो मांसासह साहित्य जप्त, संशयिताचा शोध सुरू..

नशिराबाद | डॉ.दिपक लोखंडे | पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद शहरातील इस्लामपुरा परिसरात गोवंश मांसाची अवैध विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सुमारे २० किलो गोवंश सदृश्य मांस, वजनकाटा आणि लोखंडी कोयता असा एकूण चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, पोलिसांना पाहताच विक्री करणारा संशयित घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

भुसावळ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांना १ नोव्हेंबर रोजी नशिराबाद येथील इस्लामपुरा भागात गोवंश मांसाची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेतली.पोलीस कॉन्स्टेबल रुपेश साळवे, तौसिफ पठाण आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल रितेश चौधरी यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता, आबीद खान रफिक खान यांच्या घरासमोरील रस्त्यावर एक व्यक्ती लोखंडी कोयत्याने मांसाचे तुकडे करून विक्री करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याने मांस व विक्रीचे साहित्य जागेवरच सोडून पळ काढला.

पोलिसांनी संबंधित व्यक्तीची ओळख पटवली असून, त्याचे नाव असलम कुरेशी अय्युब कुरेशी (वय ३०, रा. इस्लामपुरा, नशिराबाद) असे आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गोवंश मांस विक्रीसंदर्भात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गल्लीबोळांचा आधार घेत तो पसार झाल्याने त्याचा शोध घेण्यात येत आहे.घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. जप्त केलेल्या मांसाचा नमुना वैज्ञानिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. उर्वरित मांसाची नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला.

या प्रकरणी संशयित असलम कुरेशी याच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र ठाकरे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या