नशिराबादमध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळेत २० मिनिटांची कपात; नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन
नशिराबाद | डॉ.दिपक लोखंडे | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने भविष्यात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नशिराबाद नगरपरिषदेने पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, १ नोव्हेंबर २०२६ पासून पाणीपुरवठ्याच्या वेळेत २० मिनिटांची कपात करण्यात आली असून, आता नागरिकांना केवळ एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पुढील आदेशापर्यंत ही कपात लागू राहणार आहे.
नशिराबाद नगरपरिषदेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभागामार्फत नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तसेच उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पुढील उन्हाळ्यापर्यंत पुरविण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी बचतीसाठी नगरपरिषदेने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती कीर्तिकांत चौबे यांनी केले आहे.
पाणी बचतीसाठी नागरिकांना सूचना
नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा. नळ उघडा सोडू नये तसेच घरातील गळणारे नळ तात्काळ दुरुस्त करावेत. वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा. पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकाम, गाड्या धुणे किंवा अंगण धुण्यासाठी करू नये. छतावरील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करून भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. रस्त्यावर पाण्याची पाइपलाइन फुटल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नगरपरिषद कार्यालयास कळवावे.फिल्टरमधून वाया जाणारे पाणी झाडांना किंवा साफसफाईसाठी वापरावे. लहान मुलांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करावी. लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये पाण्याचा अपव्यय टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
‘पाणी वाचवा, भविष्य वाचवा’ हा संदेश देत नागरिकांनी आपल्या छोट्या प्रयत्नांतून संपूर्ण शहराचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सहकार्य करावे, अशी नम्र विनंती नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

