पहिल्याच दिवशी राज्यभर कारवायांची मालिका; निकृष्ट तूप, खवा व रासायनिक आंबे जप्त
मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारताच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्नभेसळ आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे सलग दोन दिवसांत करण्यात आलेल्या कारवायांमुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे FDA पथकाने छापा टाकून कृत्रिम रसायनांच्या साहाय्याने पिकवलेले सुमारे ८०० किलो आंबे जप्त केले. या आंब्यांची किंमत जवळपास २० हजार रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्यास घातक रसायनांचा वापर होत असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.याच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले. FDA अधिकाऱ्यांनी कारवाई करून सुमारे ४० हजार ९६० रुपयांचे संशयित तूप जप्त केले. संबंधित विक्रेते व उत्पादकांविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बुधवारी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा परिसरातही FDA ने मोठी कारवाई करत तब्बल २१५ किलो निकृष्ट दर्जाचा खवा जप्त केला. या खव्याची अंदाजित किंमत ४७ हजार ३०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हे नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.“ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही. सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे,” असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.तुकाराम मुंढे हे कठोर प्रशासन, पारदर्शक कार्यपद्धती आणि शिस्तप्रिय भूमिकेसाठी ओळखले जातात. विविध प्रशासकीय पदांवर काम करताना त्यांनी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे FDA विभागात त्यांच्या नेतृत्वाखाली अन्नभेसळ, बनावट औषध विक्री तसेच परवान्यांमधील गैरप्रकारांवर प्रभावी नियंत्रण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्यभरातील नागरिकांकडून FDA च्या या धडक मोहिमेचे स्वागत होत असून जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.

