Thursday, May 28, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामुक्ताईनगर तालुक्यात पुन्हा अवैध ट्रान्सफार्मर प्रकरण; सातोड स्मशानभूमीजवळ संशयास्पद बसवणूक

मुक्ताईनगर तालुक्यात पुन्हा अवैध ट्रान्सफार्मर प्रकरण; सातोड स्मशानभूमीजवळ संशयास्पद बसवणूक

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर तालुक्यात महावितरणच्या परवानगीशिवाय आणि कोणतीही अधिकृत प्रक्रिया न करता ट्रान्सफार्मर बसवण्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील सातोड गावाजवळील स्मशानभूमी परिसरात संबंधित ठेकेदाराने राज्याबाहेरून चोरून आणलेला ट्रान्सफार्मर अवैधरित्या बसवल्याची गंभीर माहिती समोर येत आहे.यापूर्वीही तालुक्यात विनापरवानगी रोहित्र बसवण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याबाबत वृत्त प्रसिद्ध होऊनही संबंधित ठेकेदारावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. उलट प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फायदा घेत पुन्हा नव्याने अवैध ट्रान्सफार्मर बसवण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, सातोड गावाजवळील स्मशानभूमी परिसरात रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली सुरू होत्या. त्यानंतर काही दिवसांतच त्या ठिकाणी ट्रान्सफार्मर उभा करण्यात आला. विशेष म्हणजे या कामासाठी ना ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आली, ना महावितरणच्या अधिकृत नोंदीत याचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित ट्रान्सफार्मर हा राज्याबाहेरून अनधिकृत मार्गाने आणण्यात आल्याची चर्चा आहे. जर हे सत्य असेल तर हा केवळ वीज विभागाचा गैरप्रकार नसून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण असू शकते.दरम्यान, “वारंवार तक्रारी आणि बातम्या समोर येऊनही प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे संबंधित ठेकेदाराचे मनोबल वाढले आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महावितरण प्रशासनाने याप्रकरणी तातडीने तपास करून संबंधित ट्रान्सफार्मर अधिकृत आहे की अवैध, याबाबत खुलासा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या