Thursday, July 2, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगावात उतारा नोंदीसाठी १५ हजारांची मागणी; भूमि-अभिलेख कार्यालयातील भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

जळगावात उतारा नोंदीसाठी १५ हजारांची मागणी; भूमि-अभिलेख कार्यालयातील भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील एका भूकरमापकाला उतारा अद्ययावत करून देण्याच्या कामासाठी लाचेची मागणी करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या कारवाईमुळे महसूल व भूमी अभिलेख विभागातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.या प्रकरणात जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५) या भूकरमापकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या कुटुंबाचे जळगाव शहरात वडिलोपार्जित घर आहे. संबंधित मालमत्तेबाबत कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत तक्रारदाराने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अपील दाखल केले होते. सुनावणीनंतर संबंधित घराच्या उताऱ्यावर तक्रारदाराच्या वडिलांचे नाव नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते.दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी तक्रारदाराने डिसेंबर २०२५ तसेच जून २०२६ मध्ये अर्ज सादर करून पाठपुरावा केला. मात्र, दीर्घकाळ काम प्रलंबित राहिल्याने तक्रारदाराने संबंधित भूकरमापकाकडे चौकशी केली असता, काम मार्गी लावण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने प्राथमिक पडताळणी केली असता, संबंधित कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली १० हजार रुपये तसेच स्वतःसाठी ५ हजार रुपये अशी एकूण १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.यानंतर बुधवारी एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताना जितेंद्र पाटील यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी केली. पथकात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक सुरेश पाटील, संगिता पवार, राकेश दुसाने, प्रदीप पोळ आणि मनोज पाटील यांचा सहभाग होता.दरम्यान, शासकीय कार्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारे लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या