Wednesday, July 1, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याज्येष्ठत्व हा समाजाचा अमूल्य दागिना - अण्णा जोगदंड

ज्येष्ठत्व हा समाजाचा अमूल्य दागिना – अण्णा जोगदंड

सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघात वाढदिवस अभिष्टचिंतन व संगीत मैफलीत ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे (पिंपरी-चिंचवड) | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जून महिन्याच्या अखेरच्या दिवशी सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिन्यात वाढदिवस असलेल्या १२४ पुरुष व महिला सभासदांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात संगीत गायन, केक कापणे व सत्कार समारंभामुळे आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सुदाम दिवटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ तसेच माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर संघाच्या सभासदांनी सादर केलेल्या बहारदार संगीत गायनाच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. जवळपास एक तास रंगलेल्या या कार्यक्रमाला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी बोलताना अण्णा जोगदंड म्हणाले की, “ज्येष्ठ नागरिक हे दोन पिढ्या घडविण्याचे काम करीत असतात. आपल्या मुलांबरोबरच नातवंडांवरही संस्कारांची छाप उमटविण्याचे कार्य ते करत असतात. आपला अनुभव, नातेसंबंध आणि परंपरेची शिदोरी समाजाला देणारे ज्येष्ठत्व हा खऱ्या अर्थाने समाजाचा अमूल्य दागिना आहे.” माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन करताना, “वय विसरून तरुणासारखे जगा, आवडत्या गोष्टी करा आणि मन प्रसन्न ठेवा,” असा मोलाचा सल्ला दिला.

महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ यांनी सांगितले की, “महासंघासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीची मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे करण्यात आली असून चिंचवड येथे महासंघाची पाच मजली इमारत लवकरच पूर्णत्वास येणार आहे.”संघाचे अध्यक्ष सुदाम दिवटे यांनी संघाच्या विविध उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, “वर्षभर ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच संघाच्या माध्यमातून ४०० ज्येष्ठ नागरिकांना बस सवलत कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे.”कार्यक्रमादरम्यान वाढदिवस असलेल्या सभासदांचे सौ. राजश्री शेलार, सौ. सुरेखाताई सावंत व सौ. भारती कोळेकर यांनी औक्षण केले. संघाच्या वतीने सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर वाढदिवस असलेल्या सभासदांनी केक कापून आनंद साजरा केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष साहेबराव देसले यांनी केले, तर सूत्रसंचालन सचिव सुरेश बडगुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खजिनदार प्रकाश सावंत, तुकाराम कोरडे, किशोर गायकवाड, धोंडीराम पाटील, राजेंद्र मोरे, शिवकांत जैस्वाल, रोहिदास पिलाने आणि धनाजी शिंदे यांनी सहकार्य केले.यावेळी महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ, संघाचे अध्यक्ष सुदाम दिवटे, अण्णा जोगदंड, माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या