मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावामध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावाला लागून असलेल्या शेतामध्ये डीपीजवळ शेणखताचा साठा ठेवण्यात आला होता. अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून शेणखताने पेट घेतला आणि काही क्षणातच आगीने मोठे स्वरूप धारण केले.या आगीत पवन दामोदर चिखलकर (वय 25, रा. निमखेडी खुर्द, ता. मुक्ताईनगर) यांचे मोठे नुकसान झाले. आगीत अंदाजे दहा बकऱ्या तसेच चार ते पाच लहान बकऱ्यांची पिल्ले जळून मृत्युमुखी पडली. तसेच गहू, ज्वारी यासह शेतीमध्ये वापरण्यात येणारे ठिबक सिंचन साहित्य आणि इतर शेती साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाले.घटनेची माहिती मिळताच बोदवड येथील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला व आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. तसेच पोलीस प्रशासनानेही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावातील नागरिकांनीही घरोघरी पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली.
या आगीत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

