आध्यात्मिक महत्त्वावर मार्गदर्शन; बालिकांच्या नृत्याने वेधले उपस्थितांचे लक्ष
मुक्ताईनगर | प्रतिनिधी :- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय, मुक्ताईनगर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सेवाकेंद्र संचालिका वर्षा दीदी व सुषमा दीदी यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आध्यात्मिक महत्त्व तसेच त्यामागील रहस्य उपस्थितांना समजावून सांगितले.श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रेम, पवित्रता, शांती आणि सद्गुणांचा संदेश त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांपर्यंत पोहोचविला. कार्यक्रमादरम्यान लहान मुलींनी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित आकर्षक नृत्य सादर केले. बालिकांच्या मनमोहक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत आनंद व्यक्त केला.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच श्रीकृष्ण कार्डचे वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम आनंदी, उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.