प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत उत्साह; विद्यार्थ्यांनी सांभाळले दिवसभराचे शालेय कामकाज.
नशिराबाद | प्रतिनिधी :- नशिराबाद शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत संपूर्ण दिवसाचे शालेय कामकाज सांभाळले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रमाणे वर्गावर अध्यापन करून शिक्षकी पेशातील जबाबदारीचा अनुभव घेतला.या उपक्रमात ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थी मुख्याध्यापिका म्हणून श्रुती कोष्टी, विद्यार्थी उपमुख्याध्यापिका म्हणून कृतिका राऊत, तर विद्यार्थी पर्यवेक्षक म्हणून चिराग झटके यांनी जबाबदारी सांभाळली. विद्यार्थी शिक्षकांनी दिवसभर वर्गावर अध्यापन करताना आलेले अनुभव यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशिराबाद नगरपरिषद नगराध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील होते. डी. एन. पाटील यांनी संपूर्ण दिवसभराच्या उपक्रमाचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. ए. बनसोडे यांनी विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना शाबासकी दिली.यावेळी शाळेचे ज्येष्ठ संचालक जनार्दन माळी, ॲड. प्रदीप देशपांडे, उपमुख्याध्यापक ए. डी. चौधरी तसेच पर्यवेक्षक एस. एन. पाचपांडे उपस्थित होते.शिक्षक दिनानिमित्त नशिराबाद शिक्षण मंडळाच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका सारंगी नारखेडे, प्रिया कोष्टी, श्रावणी राखुंडे व टीना धांडे यांनी केले. यज्ञेश टेमकर यांनी आभार मानले.
प्राथमिक विद्यामंदिरातही शिक्षक दिन उत्साहात
विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका; शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार
नशिराबाद | प्रतिनिधी :- नशिराबाद शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रविण महाजन होते. मंचावर विद्यार्थी मुख्याध्यापक गितेश चव्हाण, विद्यार्थी उपमुख्याध्यापक मृणाल चौधरी, विद्यार्थी पर्यवेक्षक तन्वी माळी तसेच विद्यालयाच्या उपशिक्षिका मंगला चौधरी उपस्थित होत्या.शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत वर्गावर अध्यापन केले. विद्यार्थीच शिक्षकाच्या भूमिकेत आल्याने विद्यालयात दिवसभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त केले. स्वरा अत्तरदे, देवेंद्र भोई व त्रिशा माळी यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे केली.विद्यालयाच्या उपशिक्षिका मंगला पिंगळे यांनी मनोगतात शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची ओळख असून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सदैव सन्मान राखावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष तथा नशिराबाद नगरीचे नगराध्यक्ष योगेश पाटील, ज्येष्ठ संचालक जनार्दन माळी, ॲड. प्रदीप देशपांडे व माध्यमिक उपशिक्षक जे. वाय. महाजन यांच्या हस्ते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन वंदना पाटील, नंदिनी सूर्यवंशी, वर्षा नारखेडे व मंगला पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका हर्षिता घोडकर व पायल पाटील यांनी केले, तर प्रेक्षिता खाचणे यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.