Saturday, June 27, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणपत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघाचा निषेध; कठोर कारवाईची मागणी

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघाचा निषेध; कठोर कारवाईची मागणी

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पत्रकारांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कथित घटनेविरोधात नशिराबाद पत्रकार संघाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी संबंधित खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघातर्फे करण्यात आली आहे.

यासंदर्भात शुक्रवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना निवेदन सादर करण्यात आले. पत्रकारांशी अपमानास्पद वर्तन करून धमकावण्याच्या प्रकारामुळे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात झाल्याची भावना पत्रकार संघाने व्यक्त केली.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, समाजातील विविध घडामोडी निष्पक्षपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य पत्रकार करत असतात. अशा परिस्थितीत पत्रकारांना धमक्या देणे, अश्लाघ्य भाषा वापरणे किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे हे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचविणारे आहे. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीची जाणीव ठेवून वर्तन करणे अपेक्षित असताना घडलेला हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याचे संघाने म्हटले आहे.

पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने ठोस पावले उचलावीत तसेच संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. भविष्यात पत्रकारांवर दबाव टाकण्याचे किंवा धमकावण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी कठोर संदेश देणारी कारवाई आवश्यक असल्याचे पत्रकार संघाने स्पष्ट केले.सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल व नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
यावेळी नशिराबाद पत्रकार संघाचे सुनील भावसार, प्रा. विश्वनाथ महाजन, चंदन पाटील, हरीश पाटील, सुनील महाजन, सागर मोरे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या