गटारीतील कचरा रस्त्यावरच, नगरपंचायत प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप
मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये स्वच्छतेच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले असून गटारीतील कचरा अनेक दिवसांपासून रस्त्यावरच पडून असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन असह्य झाले असून नगरपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी जोरदार टीका केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी गटारीची साफसफाई करण्यात आली. मात्र गटारीतून काढलेला कचरा उचलण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. परिणामी कचऱ्याचे ढिगारे रस्त्याच्या कडेला पडून असून त्यातून तीव्र दुर्गंधी येत आहे. तसेच डास, माशा आणि इतर कीटकांचे प्रमाण वाढल्याने साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.”स्वच्छ शहर”च्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाला प्रत्यक्षात नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही चिंता नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. अनेकदा कचरा संकलन गाडीही वेळेवर येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.
याबाबत संतप्त नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “गटारीतील कचरा तात्काळ उचलून परिसराची स्वच्छता करण्यात यावी. अन्यथा नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी.”प्रभाग क्रमांक ९ मधील या समस्येकडे नगरपंचायत प्रशासन कितपत गांभीर्याने पाहते आणि नागरिकांना या घाणीच्या विळख्यातून कधी मुक्ती मिळते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

