संदीप अलकरी यांचे अपघाती निधन; वाहनचालक फरार, एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील आर.एल. चौफुली परिसरात अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात अयोध्या नगर येथील रहिवासी संदीप सुपडू अलकरी (वय ४८) यांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप अलकरी हे एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. रविवारी दुपारी काम आटोपून ते नेहमीप्रमाणे दुचाकीने आपल्या घरी परतत असताना सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास आर.एल. चौफुली येथे अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत संदीप अलकरी यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह पसार झाला असून, अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.संदीप अलकरी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक व परिचितांनी मोठी गर्दी केली होती.