ईसीजी, रक्तदाब, मुख व स्तन कर्करोग तपासणीसह तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन; मोफत औषधांचेही वाटप
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नशिराबाद येथे नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध आजारांचे प्राथमिक निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आवश्यक औषधांचे मोफत वितरण अशा सर्वसमावेशक सेवांमुळे या उपक्रमाचा सुमारे २२० नागरिकांनी लाभ घेतला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव, डॉ. ए. जी. भंगाळे यांच्या समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट), नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २६) श्री इच्छापूर्ती हॉल येथे सकाळी आयोजित या शिबिरात शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
शिबिरादरम्यान ईसीजी, रक्तदाब तपासणी, प्राथमिक आरोग्य परीक्षण तसेच मुख कर्करोग व स्तन कर्करोगासंदर्भातील तपासणी आणि जनजागृती करण्यात आली. महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तपासणीनंतर गरजेनुसार रुग्णांना औषधांचे मोफत वितरण करण्यात आले, तर विविध आजारांपासून बचावासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शनही केले.आरोग्याबाबत वेळोवेळी तपासणी करून आजारांचे लवकर निदान होणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सामाजिक उत्तरदायित्व जपत राबविण्यात आलेल्या या शिबिरामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या.या प्रसंगी आमदार अनिल भाईदास पाटील, माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर, डॉ. ए. जी. भंगाळे, सय्यद बरकत अली, योगेश देसले, मुकुंदा रोटे, मन्यार असिफ शेख गनी, मुस्ताक, नामदेव चौधरी, लीलाधर तायडे, प्रदीप माळी, स्वप्निल जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या आयोजनाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) नशिराबाद शहराध्यक्ष गणेश नथ्थू चव्हाण यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन तुषार रंधे यांनी केले.आरोग्य जनजागृतीसह नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रभावी उदाहरण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.