जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव तालुक्यात एका महाविद्यालयीन तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकावून तिच्याकडून पैशांची उकळपट्टी करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आसोदा येथील एका तरुणाविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात विनयभंग व खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ पासून संबंधित तरुणाने १९ वर्षीय विद्यार्थिनीशी वारंवार मोबाइल व सोशल मीडियावरून संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. ओळख वाढविण्याच्या हेतूने त्याने तरुणीचे सोशल मीडियावरील छायाचित्रे मिळवून, संभाषणाच्या कथित रेकॉर्डिंगसह ती व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच हे फोटो व माहिती तिच्या कुटुंबीयांना पाठवून बदनामी करण्याची भीतीही दाखविण्यात आली.सततच्या धमक्यांमुळे तरुणी मानसिक तणावाखाली गेली होती. आरोपीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत दबाव टाकल्याचा आरोप असून, बदनामीची भीती दाखवून गेल्या वर्षभरात तिच्याकडून एक लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. एवढ्यावर न थांबता आरोपीने पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी करत त्रास देणे सुरूच ठेवले.मानसिक छळ असह्य झाल्यानंतर संबंधित तरुणीने १९ मे रोजी रात्री जळगाव तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून नीलेश हिरामण मराठे (रा. आसोदा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार सुनील पाटील करीत आहेत.

