भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील सुनसगाव परिसरात विहिरीवरील विद्युत पंपांच्या केबल वायर चोरीच्या घटनांना उधाण आले असताना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे केबल चोरीचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत केबल वायर जाळून त्यातील तांब्याच्या तारा काढलेला मुद्देमाल आढळून आला असून, पोलिसांनी आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे.सुनसगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विहिरींवरील विद्युत पंपांना जोडलेल्या केबल वायर चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या.परिसरातील काही गावांमध्येही अशाच प्रकारे केबल चोरी सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. पिके शेतात उभी असताना पावसाने दडी मारल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असतानाच केबल चोरीच्या घटनांमुळे मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.दरम्यान, गेल्या दोन दिवसांत सुनसगाव येथे पुन्हा केबल चोरीच्या घटना घडल्या. त्यात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीवरील केबल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि पोलीस पाटील यांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली.दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजता गावातील पदाधिकाऱ्यांना काही तरुणांकडे केबल चोरीशी संबंधित मुद्देमाल आढळून आला. त्यामध्ये केबल वायर जाळून त्यातून काढलेल्या तांब्याच्या तारा तसेच त्या तारा घेण्यासाठी आलेले दोन इसम आढळून आले. याबाबत पोलीस पाटील यांनी तत्काळ भुसावळ तालुका पोलिसांना माहिती दिली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व आठ संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) कार्यालयात नेण्यात आले.चौकशीनंतर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केबल चोरीच्या घटनांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना या कारवाईमुळे काहीसा दिलासा मिळाला असून, या प्रकरणाच्या पुढील तपासात केबल चोरीच्या इतर घटनांचा तसेच या प्रकारामागील संपूर्ण साखळीचा उलगडा होतो का, याकडे लक्ष लागले आहे.