जिल्ह्यात अद्याप टँकरची गरज नाही; १४ विहिरींचे अधिग्रहण, नागरिकांना दिलासा
जळगाव | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा आणि वीज सेवा अखंडित ठेवणे अत्यावश्यक असून कोणत्याही परिस्थितीत या सेवा खंडित होऊ नयेत, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.जिल्हा नियोजन सभागृहात पाणीटंचाई आणि वीजपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत सोनवणे, अनिल पाटील, अमोल जावळे यांच्यासह जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

शहरी तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांवर वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची विशेष दक्षता महावितरणने घ्यावी, असे निर्देश देताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, अत्यावश्यक कारणास्तव वीज किंवा पाणीपुरवठा बंद करावा लागल्यास जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणे बंधनकारक राहील. टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्येही वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.जलजीवन मिशन अंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याचे आदेश देत, वीज जोडणीअभावी रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास संबंधित मोटर कनेक्शन तातडीने बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले.

नगरपालिका व नगरपंचायत स्तरावरील विकासकामांमध्ये गुणवत्ता अबाधित राहावी, यासाठी अत्यल्प दरातील कामांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. अपूर्ण पाणीपुरवठा योजना त्वरित पूर्ण करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.दरम्यान, भुसावळ औद्योगिक क्षेत्रातील वीज समस्यांमुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देत, या समस्येचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिल्या. तसेच अमृत योजनेअंतर्गत प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रास्ताविकात माहिती देताना सांगितले की, मागील तीन वर्षांत जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्य नोंदविला गेला असून सध्या प्रमुख धरणांसह सुमारे ४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा एप्रिलपर्यंत टँकरची गरज भासलेली नसून १४ ठिकाणी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बहुतांश योजना अंतिम टप्प्यात पोहोचल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, नगरपरिषदांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.यात नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील (पिंटू शेठ), व उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

