जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रमुख प्रायोजकत्वाखाली व अलरीक इलेक्ट्रिकल्स यांच्या सहप्रायोजकत्वात होणारी ही टी-२० लीग १८ ते २६ एप्रिल दरम्यान कांताई नगर, जैन ड्रीम स्पेसेस, मेहरूण तलाव परिसरात रंगणार आहे.स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित रॅलीत सहा संघांचे मालक, प्रशिक्षक व खेळाडूंनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. काव्यरत्नावली चौकातून सुरू झालेल्या या रॅलीला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार यांच्यासह मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवली.रॅलीने कलेक्टर बंगला मार्ग, मू. जे. महाविद्यालय, प्रभात चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे डेअरी चौक, बेंडाळे चौक, चित्रा चौक आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा काव्यरत्नावली चौक गाठला. यावेळी सहा संघांच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.
जळगाव कोगटा किंग, पाचोरा एसकेटी योद्धाज, जामनेर सातपुडा हिरोज, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स, अमळनेर सुहांस जायंट्स आणि रावेर रॉयल्स या संघांचे खेळाडू संघाचे ध्वज व जर्सी परिधान करून रॅलीत सहभागी झाले होते. “आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.या लीगमुळे शहरात क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह विविध कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

